Saturday, October 30, 2010

सेक्समधील एकाग्रतेसाठी 'पद्मासन'

योग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या शब्दाचा अर्थ 'जोडणे' अथवा 'मीलन' असा आहे. शरीर व आत्मा यांना योगाच्या माध्यमातून एक विशिष्ट आकार दिला जातो. संभोग करतांना दोन जीवांमध्ये एकाग्रता निर्माण करून त्याचे रूपांतर समाधीमध्ये करण्याचे सामर्थ्य योगामध्ये असते. परंतु, आपले शरीर अस्वच्छ असेल तर आपल्याला हा आनंद उपभोगण्यासाठी वाट पाहावी लागेल.

योगशास्त्रात विविध आसने सां‍गितले असून प्रत्येक आसनात विशिष्ट प्रकारचे गुण आहेत. संभोगात एकाग्रता मिळविण्‍यासाठी पद्मासन अधिक फायदेशीर ठरते. आपण व आपल्या जोडीदारात एकमेंकाविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम पद्मासन करत असते. सेक्स करताना आपले मन स्थिर राहणे आवश्यक असते. चित्त थार्‍यावर राहण्यासाठी ध्यानमुद्राद्वारे केले जाणारे पद्मासन अधिक फायदेशीर असते. समागमात एकाग्रता निर्माण झाल्यानंतर सेक्सचा मनमुराद आनंद आपण लुटू शकता.

पद्मासन केल्याने हाता-पायांच्या सांध्यांमध्ये, मांसपेशींमध्ये ताण निर्माण होत असतो. त्यामुळे स्नायू बळकट होतात. तसेच पोट व मुत्राशयाचे आजारही दूर होतात. शारिरीक व्याधी दूर झाल्याने शरीरात विशिष्ट उत्तेजना संचारते व संभोगक्रियेसाठी ही उत्तेजना आपल्या आनंदात नक्कीच भर घालणारी असते.

'पद्मासन' कसे कराल? एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्‍या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.

कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते.

पद्मासनाचे फायदे : 'इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक, दैविक आणि भौतिक व्याधी.

पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.

घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये.

Monday, September 27, 2010

शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर


धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहोत. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन ‍श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली. कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुर्णी नगरी दुमदुमून जात असते.

या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. 'अरे मी तुझ्याच गावास असून तू एवढ्या लांब कशासाठी निघालास, तुझ्या शेंदुर्णी नगरीत असलेल्या उकिरड्याखाली मी आहे. माझे वाहन वराह आहे. तू मला वर काढून माझी स्थापना कर.' या साक्षात्कारानंतर कडोजी महाराज वारी अर्ध्यातच थांबवून शेंदुर्णीला परतले. झालेला प्रकार गावकर्‍यांना सांगितला. परंतु, गावकर्‍यांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, महाराजांची पांडुरंगाच्या साक्षात्कारावर दृढ श्रद्धा होती. अखेर त्यांनी स्वत: उकिरडा खोदायला सुरवात केली. खोदतानाच काही फुटावरच पांडूरंगाने सांगितल्याप्रमाणे पाषाणाचा भव्य वराह बाहेर निघाला. आता गावकर्‍यांचा महाराजांवर विश्वास बसला. मग तेही या खोदकार्यात सामील झाले. अवघ्या 25 फुटावर काळ्या पाषाणातील साडेचार फुटाची पांडुरंगाची मूर्ती बाहेर आली. तीच मूर्ती सध्या मंदिरात आहे.

मूर्तीच्या उजव्या हाताला गरूड तर डाव्या हाताला हनुमान आहे. मुर्तीचा चेहरा हसरा असल्याने भाव बदलतात असे वाटते. विष्णूरूपी पांडूरंग असल्याने त्याचे ‍श्री त्रिविक्रम असे नामकरण करण्यात आले. मंदिरातील वराहाला खांदा आहे. खोदकाम करताना कुदळीचा वार पांडुरंगाच्या नाकाला लागला होता व जखमेतून रक्त आले होते, अशी ही आख्यायिका आहे. महाराष्ट्रावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचे निवारण करण्यासाठी वडार समाजबांधव शेंदुर्णी येथे वराह पुजनासाठी येत असतात.

संत कडोजी महाराजांनी त्रिविक्रमाच्या रथोत्सवास प्रारंभ केला. परंपरेनुसार शेंदुर्णी येथे कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येथे 263 वर्षांपूर्वी सागवान लाकडाचा 25 फूट उंच भव्य रथ असून संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जुना हा रथ आहे. रथाचा तोल सांभाळण्यासाठी भाविकांकडून रथाच्या चाकाला मोगरी लावण्याचे काम केले जाते. चोपदार व भालदार अशी प्राचीन परंपरा येथे पहावयास मिळते. चोपदार हा सोनार समाजाचा तर भालदार हा सुतार समाजाचा आहे. येथील वडनेरे घराण्यातील सातवे वारसदार जगन्नाथ चिंधु वडनेरे हे चोपदार आहेत व एकनाथ वामन सुतार हे भालदार म्हणून काम पाहत आहेत. भाविक मोठ्या संख्येने रथोत्सवात सहभागी होत असतात.

शेंदुर्णी नगरीतून भव्य मिरवणूक काढली जाते. गावात ज्या ठिकाणी रथ थांबला त्या ठिकाणी भाविक श्रीफळ, केळी, कानगी (दक्षिणा) वाहून रथाचे मोठ्या श्रध्देने दर्शन घेतात. सर्वधर्मातील नागरिक रथोत्सवात सहभाग घेत असतात. मुस्लिम बांधव ढोलताशे वाजवत मिरवणुकीत सहभागी होतात. तसेच लेझीम झांजे पथक व खेड्यापाड्यावरून आलेल्या वारकर्‍यांच्या टाळ मृदंग व हरिनामाच्या गजराने शेंदुर्णी नगरी दुमदुमून जाते.

यात्रोत्सव:
शेंदुर्णी नगरीतून वाहणाऱ्या सोन नदीच्या पात्रात कार्तिक शुध्द पोर्णिमेपासून 10 दिवसाची भव्य यात्रा भरत असते. दशमीपासून चतुर्दशी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

कसे पोहचाल-
महामार्ग-
जळगाव जिल्ह्यातील जामनेरपासून अवघ्या 16 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तसेच पाचोरा येथूनही शेंदूर्णी येथे जाण्यासाठी खाजगी वाहन सहज उपलब्ध होतात. औरंगाबादहून सोयगावमार्गे शेंदुर्णीला पोहचता येते.

रेल्वे मार्ग-
जामनेर- पाचोरा नॅरोगेज रेल्वे मार्गावर शेंदुर्णी रेल्वे स्थानक आहे. हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या पाचोरा स्थानकाशी जोडण्यात आलेला आहे.

हवाई मार्ग-
शेंदूर्णी येथे येण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औंरगाबाद- सोयगावमार्गे- शेंदूर्णी 125 किमी अंतर आहे.

खान्देशवासीयांचे कुलदैवत- मनुदेवी


महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना वेगळे करणार्‍या सातपुडा पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र मनुदेवी हे खान्देशवासियांचे कुलदैवत वसले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल-चोपडा महामार्गाच्या उत्तरेस असलेल्या कासारखेडे-आडगाव गावापासून साधारण 8 किलोमीटरवर मनुदेवीचे प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजुंनी पर्वतराजी आणि हिरवळीने नटलेला आहे. संपूर्ण खान्देशातील नागरिक येथे पायी, वाहनाने येवून नवसाला पावणार्‍या मनुदेवीचे श्रध्देने दर्शन घेतात.

मुनदेवीच्या इथल्या वास्तव्यामागेही कथा आहे. इसवी सन पूर्व 1200 मध्ये सातपुडा पर्वत परिसरातील 'गायवाडा' येथे ईश्वरसेन नावाचा गवळी राजा राज्य करत होता. त्याच्याकडे भरपूर गायी होत्या. त्यातील काही गायी महाराष्ट्रातील तापी नदीवर तर काही मध्यप्रदेशातील नर्मदेवर पाणी पिण्यास जात असत. त्या काळी 'मानमोडी' या आजाराची साथ संपूर्ण सातपुडा परिसरासह खान्देशात पसरली. 'मानमोडी'ने अनेक लोक व गायी मृत्युमुखी पडल्या. 'मानमोडी' टाळण्यासाठी ईश्वरसेन राजाने 'गाववाडा' पासून 3 किलोमीटरवर जंगलात इसवी सन पूर्व 1250 मध्ये मनुदेवीची स्थापना केली. देवीचे मंदिर उभारले. मनुदेवी मंदिरापासून ते गायवाडा या तीन किलोमीटवर ठिकठिकाणी दिसणारी 13 फूट रूंद भिंत आजही त्याची साक्ष देते. मानमोडी व दानवापासून देवांचे रक्षण करण्यासाठी मनुदेवीला अवतार धारण केला असा उल्लेख देवी भागवतातही आढळतो. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी मनुदेवी सातपुड्यात वास करेल, असे श्रीकृष्णाने मथुरेला जाताना म्हटले होते, अशी आख्यायिका आहे.

मंदिराच्या परिसरात सात ते आठ विहिरी आढळतात. मंदिरातील मनुदेवीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली मूर्ती, गणपती, तसेच शंकराची पिंड, अन्नपूर्णा मातेची मूर्ती मंदिराचे बांधकाम करताना उत्खननात सापडल्या आहेत. मंदिराच्या चहुबाजुंनी उंच उंच कडे आहेत तर मंदिराच्या समोर असलेल्या सुमारे 400 फुट उंचीच्या कड्यावरून कोसळणारा 'कवठाळ' नदीचा नममोहक धबधबा भक्तांना आलेला प्रवासातील क्षीण नाहीसा करतो. कवठाळ नदीचे पाणी पाझर तलावात अडविण्यात आले आहे.

मनुदेवीच्या वर्षभरातून चार यात्रा असतात. चैत्र माघ शुध्द अष्टमीला नवचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी पिठोरी आमावस्येला यात्रा भरते. नवरात्रीचे पूर्ण दहा दिवस यात्रा असते. खान्देशातील लाखो भाविक देवीचे मनोमावे दर्शन घेवून नवस फेडतात. खान्देशातील नवदाम्पत्य देवीच्या दर्शनानंतरच संसाराला सुरवात करतात. वर्षभर येथे भाविकांचे रेलचेल सुरूच असते. 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर पूजेच्या साहित्यांची दुकाने आहेत. पूर्वी मनुदेवीला येण्यासाठी सातपुड्याच्या जंगलातून केवळ एकच पायवाट होती. आता तेथे शासन व सातपुडा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानाच्या वतीने खडीकरण व कॉंक्रिटीकरण करण्यात आले आहे.

जायचे कसे?
रस्ता मार्ग - यावल व चोपड्याहून आडगाव (मनुदेवीचे) पर्यंत बससेवा आहे. तेथून रिक्षांने जावे लागते. किंवा खाजगी वाहनाने थेट मनुदेवीच्या मंदिरापर्यंत जाता येते.

रेल्वे मार्ग- भुसावळ हे रेल्वेचे जंक्शन स्थानक आहे. तेथे सर्व राज्यामधून येण्यासाठी रेल्वेगाड्या आहेत.

मधुमेहींसाठी योगासन


भारतीयांमध्ये मधुमेह हा रोग जास्त प्रमाणात दिसू लागला आहे. योग मुद्रासनाला शिकून जर त्याचा अभ्यास केला तर मधुमेह सारख्या आजारापासून तुम्ही स्वत:ला मुक्त ठेवू शकता.

योगासनाची विधी : पद्मासनात बसून उजव्या हाताच्या तळहाताला पोटावर ठेवून डाव्या हाताचा तळहात त्यावर ठेवावा. नंतर श्वास बाहेर काढत हनुवटीला जमिनीवर टिकवावे. दृष्टी समोर असावी. श्वास आत घेताना परत यावे. ही क्रिया 4-5 वेळा करावी.

योग मुद्रासन विधी : पद्मासनात बसून दोन्ही हाताला पाठीवर घेऊन उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडावे. नंतर श्वास बाहेर सोडताना हनुवटी जमिनीवर स्पर्श करावी. या वेळेस दृष्टी समोर ठेवावी. जर हनुवटी जमिनीवर टिकत नसेल तर यथाशक्ति समोर वाकावे.

योग मुद्रासनाचे फायदे : पेंक्रियाजला सक्रिय करून मधुमेहाला कमी करण्यास हा आसन फायदेशीर ठरतो. आणि या आसनामुळे पोटाचा उत्तम व्यायाम होतो.

जागृत करा सेक्स अ‍ॅनर्जी!

'भुवन ज्ञानम्‌ सूर्ये संयमात' सूर्य देवाला प्रसन्न केल्याने आपल्याला सौर ज्ञान उपलब्ध होत असते. सूर्य ऊर्जेचा केंद्रबिंदू म्हणजे आपली कामवासना होय. कामवासनाही सूर्य ऊर्जेद्वारा जागृत केली जाते आणि योगाभ्यासातून आपल्या शरीरात सूर्य ऊर्जा उत्पन्न केली जात असते.

कामवासना जागृत झाल्याने आपण ऊष्ण व उत्तेजित होऊन जातो. आपल्या शरीरात उत्पन्न झालेली सूर्य उर्जा कामवासनेवर नियंत्रण ठेवत असून तिच्यामाध्यमातून आपल्याला सौर ज्ञानही प्राप्त होते आणि याच सौर ज्ञानाने आपल्यात सेक्स अ‍ॅनर्जी जागृत होत असते.

आपल्या शरीरात एक सूर्य स्वर व एक चंद्र स्वर असतात. कामक्रीडा झाल्यानंतर जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्यातील चंद्र स्वर सक्रिय होत असतो. त्यामुळे आपल्याला कामक्रीडा केल्यानंतर झोप लागत असते. सूर्य स्वर सक्रीय झाल्यानंतर आपण अधिक आक्रमक व उत्तेजित होत असतो.

तंत्र आणि योगशास्त्रानुसार आपली सेक्स ऊर्जा जर दिशा भरकटली असेल तर त्याचा परिणाम आपल्या चरित्रावर होत असतो. सेक्स ऊर्जेची दिशा आपल्या वैवाहिक जीवनावर अवलंबून असते. आपल्या शरीरातील सूर्य ऊर्जा जर कमकुवत असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या सेक्स जीवनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेक्स ऊर्जा कशी जागृत कराल?
काही जण लठठ असतात. अर्थात त्याचा परिणाम त्याच्या सेक्स जीवनावर होत असतो. त्यांना जेवन झाल्याझाल्या डुलकी येत असल्याने त्याच्यात कामवासनाप्रति अरुचि निर्माण होणे स्वाभाविक आहे. भरपेट भोजन केल्याने निर्मान झालेला आळस व सुस्ती ही कामोत्तेजनाच्या इच्छेसाठी मारक ठरत असते. यासाठी लठ्ठपणा कसा कमी होईल, यावरच अधिक भर दिला पाहिजे. योगसाधना करून आपण आपले वजन व लठ्ठपणा कमी करू शकतात.

काही जण शरीरयष्टीने प्रमाणापेक्षा जास्तच दुबळे असतात. आपल्यातील दुबळेपणा घालविण्यासाठी भरपूर पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. जास्त आहार घेण्यापेक्षा व्यायाम व योगाभ्यास करून आपले स्नायू बळकट केले पाहिजेत.

वरील दोन्ही प्रकारच्या समस्या असणार्‍यांनी योगतज्ञ्ज यांचे मार्गदर्शन घेऊन शरीर कशाप्रकारे कसले जाईल, याकडे लक्ष ‍दिले पाहिजे. नियमित सूर्य भेदन प्राणायाम, कुंडलिनी योग व योग मुद्रा केल्याने काही दिवसात आपल्या सेक्स जीवनावर त्याचा अनुकुल परिणाम जाणवेल. यात शंकाच नाही.

इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'

प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्‍या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...

युनेस्कोच्या जागतिक वारसा वास्तूंच्या यादीत 1982 मध्ये समाविष्ट झालेल्या अजिंठा लेण्या औरंगाबाद शहरापासून 107 किलोमीटरवर स्थित आहेत. वाघोरा नदीच्या प्रवाहापासून सुमारे 76 मीटर उंचावरील घोड्याच्या नालाच्या आकारातील डोंगरात अजिंठ्याच्या तीस गुहा कोरण्यात आल्या आहेत. औरंगाबादपासून ते अजिंठ्यापर्यंतच्या दोन-अडीच तासांचा कालावधी लागतो.

19व्या शतकाच्या सुरुवातीला वाघाच्या शिकारीच्या निमित्तानं ब्रिटिश अधिकारी मेजर गिल स्मिथ जॉन या परिसरात आला असताना त्याला इथल्या 10व्या क्रमांकाच्या गुहेच्या कमानीचा थोडासा कोरीव भाग उघडा दिसला होता. त्याच्या माहितीवरूनच पुढे इथं उत्खनन करण्यात आलं आणि एक-दोन नव्हे तर तब्बल तीस बौद्ध लेण्यांच्या रुपात प्राचीन भारताच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्याला पाहता येऊ शकला. ख्रिस्तपूर्व 200 ते इसवी सन 500 ते 600 अशा सुमारे आठशे वर्षांच्या कालावधीत दोन ठळक टप्प्यात कोरण्यात आलेल्या या लेण्यांच्या निर्मात्यांचं खरंच कौतुक करावायास हवें.

बौद्ध भिक्षूंना चिंतन, मनन, तपश्चर्या आणि साधनेसाठी बाह्य जगापासून इतकी अलिप्त अन् निसर्गाच्या इतकी सन्निध्य शांत, एकांत व पवित्र जागा दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही. इथल्या प्रत्येक गुहेपासून निघणारा एक गोल जिना थेट खाली नदीपात्राकडे जातो. त्याचे अवशेष आता कुठेकुठेच निरखून पाहिले तर दिसतात. अतिशय कठीण अशा बेसॉल्ट खडकामध्ये त्या काळातील कारागीरांनी इतक्या कलात्मक, देखण्या शिल्पाकृती कोरल्या कशा असतील, याचंच पदोपदी आश्चर्य वाटत राहतं. आधी गुहेचा खडबडीत पृष्ठभाग कोरून त्यावर चिखलाचे प्लास्टर, पुन्हा त्यावर चुन्याचा पातळ थर देऊन त्यावर कलाकारांनी आपली चित्रकला प्रदर्शित केली आहे. शिल्पावर चुन्याचं प्लास्टर केल्याचं दिसतं. चिखलाच्या प्लास्टरमध्ये स्थानिक चिकणमाती, कर्नाटक किंवा तमिळनाडूत मिळणारी ग्रॅनाइटची बारीक पूड, विविध झाडांच्या बिया व तंतूंचं मिश्रण आहें. अंधार्‍या गुहांत त्यांनी प्रकाशयोजनाही अत्यंत कल्पकतेनं केली. गुहेच्या जमिनीवर पाणी भरून त्यावर बाहेरुन कापड अथवा चकचकीत धातूच्या साह्यानं सूर्यप्रकाश टाकून त्या परावर्तित उजेडात या गुहांमध्ये काम करण्यात आलं.

या तीस लेण्यांपैकी 9, 10, 19, 26 व 29 या पाच लेण्यांत चैत्यगृह आहेत. उरलेल्या सर्व लेण्या विहार आहेत. इथल्या सहा लेण्यांची निर्मिती ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकात बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाच्या काळात झाली. यामध्ये 9, 10 या चैत्यगृहांसह 12, 13 व 15 व्या विहारांचा समावेश आहे. उरलेल्या लेण्या पुढे महायानपंथाच्या काळात निर्माण करण्यात आल्या. याठिकाणी हीनयान आणि महायान यांच्यातील ढोबळ फरक असा सांगता येईल की हीनयान हे मूर्तीपूजक नसून स्तूप किंवा जीवनचक्रासारख्या प्रतीकाची उपासना करतात तर महायानपंथी मूर्तीपूजक असतात. इथल्या काही गुहांमध्ये स्तुपावर बुद्धप्रतिमा कोरल्याचे दिसते, यावरुन त्या ठराविक काळात हीनयान व महायानपंथीयांच्या विचारसरणीचा संगम झाल्याचे दिसते. तर 11 क्रमांकाच्या गुहेमध्ये महायानांनी स्तुपालाच बुद्धप्रतिमेमध्ये प्रवर्तित केल्याचे दिसते. त्यामुळे बुद्धप्रतिमेच्या दोहो बाजूंना नेहमी दिसणारे पद्मपाणि व वज्रपाणी केवळ या प्रतिमेच्याच बाजूला दिसत नाहीत. कारण स्तुपासाठी आधीच दगड कोरल्याने त्यांच्यासाठी जागाच उरलेली नाही.

बुद्धाच्या जन्मकथेपासून महापरिनिर्वाणापर्यंतच्या कथांचा प्रवास दर गुहेगणिक इथं उलगडत जातो. त्याला जोड मिळते ती जातकातील सुरस कथांची. इथलं प्रत्येक चित्र-शिल्प आपल्याशी बोलतं, काही सांगू पाहतं. गरज असते ती आपण थोडा वेळ देण्याची. आपण जितकं पाहू तितकं त्यातलं नाविन्य प्रतित होत जातं. अप्रतिम शिल्पांबरोबरच शेकडो वर्षांपूर्वी नैसर्गिक रंगांत रंगविलेली चित्रं आजही तितकीच टवटवीत आहेत. आधुनिक तर इतकी की त्रिमितीय आणि चौमितीय आभास निर्माण करण्याची क्षमता या चित्रांत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पहिल्या गुहेतील पद्मपाणि. या चित्राच्या समोर उभं राहिलं की त्याचे दोन्ही खांदे एका रेषेत दिसतात. तेच चित्र डावीकडून पाहिलं की पद्मपाणिचा डावा खांदा वर उचलल्यासारखा आणि उजवीकडून पाहिलं की उजवा खांदा वर उचलल्यासारखा दिसतो. त्याची मानही त्याच प्रमाणात अधो वा उर्ध्व झाल्यासारखी वाटते. हा त्रिमितीय आभास चित्रात नाही तर ज्याठिकाणी आपण उभे राहतो, त्या अंतरावर अवलंबून असल्याचं दिसतं. हाच आभास 26 व्या गुहेतील बालकाच्या बाबतीतही आढळतो. कोठूनही पाहिलं तरी ते आपल्याकडे पाहात असल्याचा आभास होतो.

पहिल्या गुहेतील भगवान बुद्धाची मूर्तीही अशीच आश्चर्यजनक त्रिमितीय आभास देणारी. या मूर्तीवर उजवीकडून प्रकाश टाकला तर तिच्या चेहर्‍यावर कष्टी भाव दिसतात- जगातील दु:ख पाहून जणू भगवंत दु:खी झाले आहेत. डावीकडून प्रकाश टाकला तर याच चेहर्‍यावर समाधानाचे प्रसन्न भाव दिसतात- दु:खाचे मूळ आणि निर्वाणप्राप्तीचा मार्ग सापडल्याचा जणू हा आनंद आहे. समोरुन प्रकाश टाकला असता चेहर्‍यावर एकदम शांत, ध्यानस्थ भाव दिसतात. एकाच मूर्तीत त्रिमितीचं असं अन्य उदाहरण सापडणं दुर्मिळच. याच गुहेतील उधळलेला बैल हा चौमितीचं उत्कृष्ट उदाहरण. ही चौथी मिती असते आपल्या दृष्टीकोनाची. सुरवातीला चित्राकडे पाहिलं तर काही विशेष असं न वाटणारं. पण जेव्हा आपल्याला सांगण्यात येतं की तुम्ही कोठूनही पाहा, तो आपल्यामागे धावतोय, असं वाटेल. त्यानंतर त्या चित्राकडे पाहिलं असता तसंच वाटतं.

पद्मपाणिखेरीज फ्लाइंग अप्सरा, फ्लाइंग इंद्रा, अवलोकितेश्वर, कुबेर अशा जागतिक दर्जाच्या श्रेष्ठ कलाकृती इथं जागोजागी आढळतात. तत्कालीन आधुनिक व फॅशनेबल राहणीमानाचं चित्रणही याठिकाणी आहेत. यामध्ये दोनमजली, तीनमजली घरं आहेत. त्यामध्ये सोफासेट आहे, गॅलरी आहे. वार्‍याच्या झुळुकीसरशी फडफडणार्‍या मांडवाप्रमाणं भासणारं इथल्या काही लेण्यांचं छत आहे. वस्त्रप्रावरणं आणि आभुषणांची तर या चित्रांतून पखरणच आहे. राजकुमारीच्या सौंदर्यप्रसाधनाचा प्रसंग याठिकाणी आहे. तिच्या मेकअप बॉक्समध्ये असलेल्या सामग्रीपुढे आजच्या तरुणींचा मेकअप किटही फिका पडेल. लिपस्टीकची 'फॅशन' व 'पॅशन' त्या काळातही असल्याचं दिसतंच, त्यातही केवळ खालच्या एका ओठालाच लिपस्टीक लावण्याची फॅशन या चित्रांतून दृगोच्चर होते. आभुषणांच्या बाबतीतही तो काळ अत्यंत समृद्ध व पुढारलेला असाच दिसतो आणि वस्त्रांच्या बाबतीतही मिनी-मिडीपासून मॅक्सी- साडीपर्यंत अशी व्हरायटी दिसते.

बौद्ध लेणी असल्यामुळे साहजिकच भगवान बुद्धांच्या हजारो मूर्ती येथे पाहावयास मिळतात. अगदी सव्वा इंची मूर्तीपासून ते महापरिनिर्वाणावस्थेतील 24 फुटी बुद्ध मूर्तीपर्यंत सर्वच मूर्ती अत्यंत देखण्या अन् बारकाईनं पाहिलं तर एकमेकांपेक्षा भिन्न अशा आहेत.

अजिंठा हा आपला अमूल्य ठेवा आहे, तेव्हा तो पाह्यला जाताना मोठ्या आदरानं गेलं पाहिजे. पुन्हा तिथं काही कोरणं, कचरा करणं म्हणजे त्या कलाकारांचा व कलाकृतींचा अपमानच. जेव्हा वर चढून जाल तेव्हा दमलेल्या अवस्थेत कोणत्याही गुहेत जाऊ नका, कारण आपल्या जोराच्या श्वासोच्छवासातून निर्माण होणारी आर्द्रताही या चित्रांना घातक ठरू शकते. या शिल्प-चित्रांना जपण्यासाठी.
(साभार- महान्यूज)

इंटरनेटवर भरतो आता 'ज्येष्ठांचा मेळा'

काल-परवापर्यंत सोशल नेटवर्किंग साइट्सवर फक्त तरुणांचीच मक्तेदारी होती. हे जग त्यांचेच असा समज होता. आता मात्र या साइट्सवर वयाने ज्येष्ठ, पण मनाने 'तरुण' असलेले गर्दी करू लागले आहेत. परिणामी, ऑर्कुट, फेसबुकसारख्या सोशल साइट्स्ना भेट देणाऱ्या ज्येष्ठांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, इंटरनेटवरच आता ज्येष्ठांच्या गप्पा रंगू लागल्या आहेत.


'प्यू इंटरनेट अॅण्ड अमेरिकन लाइफ प्रोजेक्ट'ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात पन्नाशीतील आणि त्यावरील वयाच्या सदस्यांची सोशल नेटवर्किंग साइट्सला भेट देणाऱ्यांची संख्या वर्षभरात दुप्पट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे क्षणार्धात संफ साधणाऱ्या जादुई इंटरनेटच्या विश्वात 'सिनियर सिटीजन मंडळी' नवी क्रांती घडवू पाहत आहेत, असे मत 'प्यू इंटरनेट'चे वरिष्ठ संशोधक मरियम झुंझलाना यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्यानुसार एप्रिल २००९ ते मे २०१० या कालावधीत या साइट्सवरील ५० ते ६४ वयोगटातील सदस्यांची संख्या २५ वरून ८८ टक्क्यांवर पोहोचली असून, त्यात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे ६५ आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींची संख्याही दुपटीने वाढली आहे. तुलनेत अशा साइट्सना भेट देणाऱ्या १८ ते २९ वयोगटातील तरुणांच्या संख्येत मात्र अवघी १३ टक्केच वाढ झाली आहे.

आपल्या जुन्या मित्रांचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने ही वयोवृद्ध मंडळी या सोशल साइट्सच्या वापराकडे आकर्षित झाल्याची माहिती या सर्वेक्षणाच्या निमित्ताने पुढे आली आहे. आतापर्यंत ५० आणि त्यावरील वयोगटातील ५० टक्के लोकांची या नेटवर्किंगद्वारे आपल्या जुन्या मित्र-मंडळींशी भेट झाली आहे. सोशल नेटवर्किंगचा प्रसार हा अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणावर होत असला तरी भारतातही या साइट्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात मोठा वाटा तरुणांचा असला तरी मायबोली, उपक्रम, मनोगत, मिसळपाव, मी मराठी, फेसबुक, ऑर्कुट आणि अन्य सोशल साइट्सना भेट देणाऱ्या ज्येष्ठांची संख्याही अलीकडच्या काळात वाढत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन दिवस 'काढणारा' माजी कर्मचारी या साइट्सचा वापर मोठ्या संख्येने करीत असून तसेच नोकरी बदललेल्या लोकांशी संर्पकासाठीही अशा 'सोशल साइट' हा उत्तम पर्याय आहे, असे 'प्यू सेंटर'चे म्हणणे आहे. यातील मजेशीर बाब म्हणजे अशा साइट्सवरील बहुतांश तरुण वर्गाने ज्येष्ठांना आपले मित्र बनविले असून, या साइट्सच्या माध्यमातून दररोज ते एकमेकांची भेट घेत आहेत.

सुरुवातीला सोशल नेटवर्किंग साइट्सची अभिव्यक्तीचे एक साधन यापलीकडे त्याची ओळख नव्हती. गप्पाटप्पा, चर्चा हा त्यांचा मूळ उद्देश होता. पुढे जाऊन यातून विविध चॅटिंग साइट्स लोकप्रिय झाल्या. पण त्यापलीकडे लेखनाची झेप असलेल्यांसाठी ब्लॉग आणि सोशल साइट्सचे नवे विश्वही तयार झाले आहे. त्यावर विविध साहित्यप्रकारही फुलले आहेत. तरुणांच्या बरोबरीने 'ज्येष्ठ तरुणींची' गर्दीनेही ही साइट्स सध्या बहरत आहेत. त्यांची सुंदर आणि सचित्र प्रवासवर्णने, स्वादिष्ट आणि सचित्र पाककृती, कथा, कविता, विडंबने यांसारख्या वाचकांना हवीहवीशी वाटणाऱ्या साहित्याची अशा साइट्सच्या जगतात सध्या मोठी रेलचेल आहे.

गप्पाटप्पा, एकमेकांची टर उडवणे, विडंबन या माध्यमातून टवाळकी मंडळीही या साइट्सचा वापर करीत आहेत. पन्नाशीनंतर आयुष्याची वाटचाल संध्याकाळकडे केल्यानंतर घरात एका बाजूला पडून न राहता या नेटवर्किंग साइट्सवर मुशाफिरी करून म्हातारपणातील एकटेपणा, दु:ख, जडलेले आजार विसरण्याचा प्रयत्न ही मंडळी या साइट्सच्या माध्यमातून करीत असून दररोज या साइट्सवर जणू 'ज्येष्ठांचा मेळा'च भरत असल्याचे चित्र आहे.

भारतात इंटरनेटचा वापर वाढणार
भारतात इंटरनेटचा वापर तीनपटीने वाढणार असून, येत्या पाच वर्षांत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची भारतातील संख्या २७.३ कोटींवर जाईल. सध्या भारतात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ८ कोटी आहे. बॉस्टन कन्सल्टिंग समूहाच्या 'इंटरनेट न्यू बिलियन' या अहवालानुसार ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि इंडोनेशियात इंटरनेटचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या २०१५ पर्यंत १.२ अब्जावर जाईल. ही संख्या जपान आणि अमेरिकेपेक्षा तीनपट अधिक होईल. या देशांत २००९ मध्ये ही संख्या ६१ कोटी होती. येत्या पाच वर्षांत वार्षिक ९ ते २० टक्के दराने या संख्येत वाढ होईल.
विशेषत: युवकांमुळे इंटरनेटचा वापर वाढणार आहे. २०१५ पर्यंत भारतातील इंटरनेटची पोहोच १९ टक्क्यांवर जाईल.