काल (सोमवारी) पुण्यात आलेला पूर्वमोसमी पाऊस आपल्या हळव्या गुलाबी आठवणींना चिंब चिंब भिजवून गेला. पावसाच्या सरी बघताना आपण कधी काळामागे हरखून जुन्या आठवणी ताज्या केल्या ते समजलंही नाही. सगळं अगदी क्षणात घडलं. किंचितही चाहूल लागली नाही. पहिल्या पावसाची पहिली आठवण मनात अलगद जागी झाली. डोळ्यांसमोर पडदा होऊन हळुवारपणे तरळून आली. खरंच किती छान होते ते दिवस, असं नकळत मनात रेंगाळत राहिलं... अगदी कॉफीचे घोट घेतानाही... ती आठवण आपल्या सोबत होती... ती साठवण आपल्या शेजारी होती... हो ना...!
केरळात मॉन्सुननं काल (सोमवारी) हजेरी लावली. येत्या २४ तासात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर मॉन्सून येईल, अशा बातम्याही धडकू लागल्या. मॉन्सूनची बातमीच मुळी सुखद गारवा सोबत आणत असते. तीव्र उन्हाच्या झळांनी लाही लाही झालेल्या जिवांना गारव्याची अनुभूती देत असते. त्यावर भरीसभर म्हणून पुण्यात दमदार पूर्वमोसमी पावसानं हजेरी लावली. बेसावध पुणेकरांची आणि तितक्याच बेसावध असलेल्या हळव्या मनांची चांगली तारांबळ उडाली. स्थिर, संथ पाण्यात कुणी तरी इवलासा दगड टाकून निजलेल्या तलावाला जागं करावं, तसं आपलं मन खडबडून उठलं. खिडक्यांच्या फटीतून लहान मुलं डोकावतात, तसं कामाच्या धबागड्यात गुंग असलेल्या खुल्या डोळ्यांमधून पावसाचं अस्तित्व निरखू लागलं. तर काहींच्या आयुष्यात कामाचा व्याप वाढवून गेलं. पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर कुणी वाळत घातलेले कपडे गोळा करण्यात गुंग होतं, कुणी दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या चीजवस्तू आत नेत होतं, कुणी लहानमुलांप्रमाणे पावसाशी खेळत होतं, कुणी रस्त्यावर दुथडी भरून पाहणाऱ्या प्रवाहात नाचत होतं, तर कुणी दुरूनच पहिल्या पावसाच्या आठवणी जाग्या करीत होतं. प्रत्येकाचा पावसाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध येत होता. प्रत्येकजण मिळेल ती संधी साधून पावसाशी आपलं भावनिक नातं जोडत होता. जुन्या आठवणींना पहिल्या पावसाशी रिलेट करीत होता. मनाच्या खोल कप्प्यात पहिल्या पावसाचा गारवा साठवून ठेवत होता.
पहिला पाऊस कधी एकटा येत नाही. जशी ती भेटायला येताना आपल्या दोन-एक मैत्रिणी सोबत आणत असते. अगदी तसंच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट घेऊन पहिला पाऊस आपल्या भेटीला येत असतो. पाऊस आहेच मुळी थोडा लाजरा आणि थोडा बुजरा! त्यात किंचितही धीटपणा नाही. तिचा स्वभाव अगदी तंतोतंत पावसात उतरलाय. तिचं रुसणं, तिचं लाजणं, तिचं रागवणं, तिचं हसणं, तिचं रडणं, तिचं चिडवणं पावसाच्या प्रत्येक सरीत समावलं असतं. तिचा लहरीपणा सुद्धा त्यानं हुबेहूब कॉपी केलाय. जसा पाऊस कधीच वेळेवर येत नाही, तसाच कधी येणार, हे सांगत सुद्धा नाही! आपण अगदी बेसावध असतो. आपली काहीच तयारी नसते. अशा वेळी योग्य संधी साधून पाऊस येतो. तीही तशीच अगदी पावसाच्या सुखद गारव्यासारखी आपल्या आयुष्यात येते. त्याचा काळ, वेळ काही नसतो. पण ती आल्यावर आपल्या आयुष्याचं सोनं करते. हळव्या आठवणी जाग्या करते. ठिसूळ उमेदीला उभारी देते. स्वप्तरंजनाला भरारी देते. कारण तिनं अन् पावसानं आपल्या आसुसलेल्या मनावर मनापासून नितांत प्रेम केलेलं असतं. आपल्या तयारीवर, सजगपणावर किंवा बाह्य सौंदर्यावर कधीच ते भाळले नसतात. तिला मी आवडतो आणि मला ती आवडते, एवढंच दोघांचं नातं असतं. जसं पाऊस मला आवडतो आणि तो माझ्यासाठी व्याकूळलेला असतो एवढंच! पावसाची सोशिकता त्याला चक्क केरळ, कर्नाटक, गोवा ओलांडून आपल्यापर्यंत येण्यास भाग पाडीत असते. तसंच तिचं प्रेम दृष्य-अदृश्य संकटांवर मात करून आपल्यापर्यंत पोहचत असतं. सुखाची गर्द सावली देत असतं. नकळत आपलंस करीत असतं. तिच्या येण्याचा आणि न येण्याचा एवढा टोकाचा फरक आपल्याला जाणवतो.
असा हा पहिला पाऊस जुन्या आठवणी ताज्या करून जातो आणि नव्यांची मुहूर्तमेढ करण्यास जराही विसरत नाही. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या आयुष्यात... हो ना....खरंय ना...!
(लेखकाशी vijay.lad@esakal.com या इ-मेल आयडीवर इ-मेल संवाद साधा.धन्यवाद...!)
No comments:
Post a Comment