Friday, September 9, 2016



माझ्या घरातील गणपती...
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ
आमच्याकडे आराद्यदैवत गणपतीचे आगमन झाले आहे. यंदा आम्ही सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. सिद्धिविनायकची मूर्ती शाडू मातीची असून ती मी स्वत: बनवली आहे.
आपणास व आपल्या कुटुंबियांस गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!! सर्वाच्या मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ

Thursday, December 3, 2015

काळापैसा, वादविवाद, मौजमस्ती म्हणजेच IPL, वाचा डोळे उघडणारे सत्य

क्रिकेट, पैसा, करमणूक आणि वाद म्हणजेच 'आयपीएल' अर्थात इंडियन प्रीमियर लीग असे जणू समीकरणच तयार झाले आहे. वादांच्या भोवर्‍यात गंटागळ्या खात असली तरी आयपीएल ही भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळसाठी (बीसीसीआय) सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. आयपीएलच्या धर्तीवर अनेक देशांनी लीगचे आयोजन केले खरे, परंतु त्या स्पर्धांना आयपीएलएवढा पैसा व प्रसिद्धी मिळवता आली नाही. मात्र, खेळापेक्षा वादच जास्त चर्चेत आल्यामुळे काही वर्षांपासून आयपीएलची प्रसिद्धीही कमी झाली आहे. कारण, मागील सात-आठ वर्षांत क्रिकेटर रसिकांना आयपीएलमध्ये वादाशिवाय दुसरे काहीच पाहायला मिळालेले नाही.

खरं तर गुणवान क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या कल्पनेतून आयपीएलचा जन्म झाला. मात्र, ही क्रिकेट स्पर्धा कायमच वादग्रस्तच राहिली आहे. मॅच ‍फिक्सिंग असो वा क्रिकेटपटूंचे गैरवर्तन व नियमांचे पालन न केल्याने काही संघ व क्रिकेटपटूंवर करण्‍यात आलेली कारवाई, अशा एक ना अनेक वादांच्या भोवर्‍यांत आयपीएल गंटागळ्या खात आहे. असे असले तरी नव्या संघासाठी देशातील 10 उद्योजकांनी उत्सुकता दर्शवली आहे. दोन नव्या संघांसाठी येत्या 9 डिसेंबर (बुधवार) थेट बोली लावण्याची संधी देण्यात येणार आहे. 2013 मधील स्पॉट फेक्सिंग व सट्टेबाजी प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्‍यात आले होते. 2018 मध्ये दोन्ही संघ आयपीएलमध्ये पुन्हा पुनरागमन करतील.

चेन्नईच्या चेट्‍टीनाड व आयटीडब्ल्यू या दोन उद्योग समुहासह रॉन स्क्रूवाल्याचा यूनिलेझर, व्हिडिओकॉन, ग्रुप एम, इंटेक्स मोबाइल, हल्दीराम व यस बँक यांनी बीसीसीआयकडून निविदा खरेदी केल्या आहेत. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका व त्यांचे बंधु संजीव गोयंका यांनी देखील वेगवेगळी निविदा दाखल करणार आहे. त्यामुळे अखेर कोणत्या समुहाचे संघ आयपीएलमध्ये खेळतील, हे पाहाणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

आयपीएलचा लिलाव, अमूक संघात कोणता क्रिकेटपटू आहे. टमूक संघाने कोणत्या विदेशी क्रिकेटपटूला खरेदी केले आहे, याची जेवढी ओढ, उत्सुकता आधी होती, आता मात्र ती फारच कमी झाली आहे. लोकांना आयपीएलचा पार कंटाळा आला आहे. परिणामी खास आयपीएलसाठी मैदानात येणार्‍या क्रिकेटप्रेमींची संख्याही चांगलीच रोडावली झाली आहे. त्यामुळे आयपीएल ही कोंबडी भविष्यातही सोन्याची अंडी देत राहील का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.....

Monday, March 7, 2011

महिला दिन... दीन महिला...?

मार्च महिन्याच्या पूर्वसंध्येलाच बहुतेक महिला मंडळं... संघटनांना जागतिक महिला दिनाचे डोहाळे लागलेले असतात. गेल्या दहा वर्षांच्या इतिहास चाळला तर जागतिक महिला दिनमोठ्या उत्साहात साजरा केला गेल्याचे दाखले आपल्याला मिळतील. सासुरवाशीण ज्याप्रमाणे आखाजी सणाची आतुरतेने वाट पाहते, अगदी त्याचप्रमाणे महिला मंडळ तसेच गाव पातळीवरचे महिला बचत गटातील महिला या महिला दिनाची वाट पाहत असतात. महिला दिनाला आता मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले आहे. परंतु, या महिलांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी ज्या लढल्या... झगडल्या त्याच भगिनींचाच या दिवशी विसर पडलेला दिसतो.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची कवाडं खुली केली. त्यांचे ऋण तर दूरच परंतु त्यांचे स्मरणही होताना दिसत नाही. महिलांच्या हक्कासाठी ज्यांनी संघर्ष केला, स्वतःचे जीवन खर्ची घातले, एवढेच नव्हे तर सरकार, समाज आणि पुरुषप्रधान संस्कृतीशी प्रचंड संघर्ष करून एका उज्ज्वल भविष्याने या महिलांची ओटी भरली. अशा थोर महिलांचे साधे नावही कोणाच्या ओठावर येत नाही.

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ताकद ज्यांनी मिळवून दिली त्या महिलांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा हा दिवस! त्यांनी केलेल्या महान कार्यातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस! या दिवशी समाजातील सगळ्या महिला संघटनांनी एकत्र येऊन समाज प्रवाहापासून दूर राहिलेल्या दीन महिलांना हात दिला पाहिजे. तळागाळातील महिलांचा विकास करण्याचा संकल्प या दिवशी केला पाहिजे.

महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणार्‍या बहुतेक महिलांना मूलभूत अधिकार काय आहेत, हे माहीत नाही. तर त्या काय संघर्ष करणार? ‘जागतिक महिला दिनही काय भानगड आहे हेच त्यांना माहीत नाही. इतक्या त्या दीन आहेत. महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या सातपुड्याच्या डोंगरात राहणार्‍या आदिवासी महिला अतिशय मागासलेले जीवन जगत आहेत. या महिला शिक्षणच काय तर जवळपास सगळ्याच गोष्टींपासून वंचित राहिल्या आहेत. या महिलांनी कधी शाळेचे तोंड पाहिले नाही. पोटासाठी त्यांना दिवस- रात्र पायपीट करावी लागते. गरोदर महिलांना दवाखान्याअभावी प्रसूतीदरम्यान मरण यातना सहन कराव्या लागतात. प्रसूती दरम्यान मरण पावलेल्या आदिवासी महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता शासनाने आश्रमशाळा, प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत परंतु, पटावरील संख्याही बोटावर मोजण्या इतकीच असते. शिक्षणाअभावी येथील महिलांच्या जीवनातून अंधार अजूनही नाहीसा झालेला नाही. मानसिक व शारीरिक परिपक्व न झालेल्या वयातच आदिवासी समाजात मुलींचे लग्न लावून दिले जाते. येथील मुली वयाच्या १४-१५ वर्षांतच आई होतात. ज्या समाजातील महिलाच अज्ञानी असेल तर त्या समाजाचे काय होईल..?

सामाजिक संघटना, महिला मंडळे यांनी आपापसातील कार्यक्रमाची स्पर्धा थांबवून समाजातील ज्या महिला मागे राहिल्या आहेत, त्यांना मार्ग सुचत नसेल, अशा महिलांना योग्य दिशा देऊन प्रवाहात आणण्याची खरी गरज आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला संघटनांनी एकत्र येऊन मागासलेल्या महिलांना प्रवाहात आणण्यासाठी अतिदुर्गम भागात जाऊन मार्गदर्शन शिबिर घेतले पाहिजे. त्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिली पाहिजे. महिलांसाठी शासनाने राखीव ठेवलेले हक्क, सुविधा याविषयी माहिती दिली पाहिजे. एवढेच नव्हे तर या महिलांच्या दीनतेवर अभ्यासपूर्ण संशोधन करून त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या पाहिजेत, तरच जागतिक महिला दिनाचा उद्देश खर्‍या अर्थाने सार्थक ठरेल...

Wednesday, December 1, 2010

समाजपोरक्या तृतीयपंथीयांना 'आशीर्वाद'


पुणे, दि.३० : 'सेक्स' या शब्दाभोवती अनावर औत्सुक्य आणि सुखद संवेदनाचे एक विशिष्ट वलय निर्माण झाले आहे. परंतु, 'होमोसेक्शुअलिटी' किवा 'समलिंगी' हा शब्द जरी उच्चारला, तरी समोरील व्यक्तीच्या भुवया आकसल्या जातात. त्यांच्या तोंडात कडवट तार जमते, परंतु भाकरीच्या भुकेइतकीच शरीराची भूक हीसुद्धा माणसासह सर्वच प्राणांच्या जगण्याशी निगडित आहे. आणि त्याला तृतीयपंथीय तरी कसे अपवाद ठरणार? समाजाने त्यांना वाळीत टाकले आहे. समाज त्यांना वेगळे समजतो, त्यांना नेहमी डावलतो; परंतु एचआयव्हीसह जगणाऱ्या तृतीयपंथीयांचे काय? अशी खंत १ डिसेंबर, 'जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला 'आशीर्वाद इन्युचेस प्रोजेक्ट'च्या संचालिका बी. पन्ना गाबरेल यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
हावभाव, शारीरिक बदलाच्या स्वरूपामुळे 'तृतीयपंथी' असल्याचे ते लपवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणी काम देत नाही. आर्थिक साधनच नाही, तर सन्मान दूरची बाब आहे. पोटासाठी त्यांना दारोदार हिंडण्याची वेळ आली आहे. यातील कोणी नर्सिंग, कोणी डान्सर, कोणी इंटेरियर डिझायनर, तर कणी गायक असूनही केवळ तृतीयपंथीय असल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली आहे. याउलट समाजातील विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये असे अनेकजण आढळून येतात, की ते समलिगी लैंगिक संबंध (Homosexuals) ठेवत असतात. अशा समलिंगी असणाऱ्यांपैकी बहुतांश लोक तृतीयपंथीयांच्या संपर्कात येतात आणि आपली शारीरिक भूक भागवितात. अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना एचआयव्ही होण्याचा धोका अधिक असतो.
१९८१ साली अमेरिकेत लॉस अॅन्जेलिस या ठिकाणी प्रथम 'एड्स'चे रोगी निदर्शनास आले. त्या वेळी नवीन रोगाचे कारण कळू शकले नाही. 'एड्स' हे नावही त्या वेळी ठेवले गेले नव्हते; पण हा रोग समलिंगी लैंगिकसंबंध (Homosexuals) ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये दिसून आला होता, याची मात्र नोंद घेतली गेली. अनैसर्गिक संबंध ठेवल्याने तृतीयपंथीयांना आरोग्याच्या गंभीर समस्या उदभवतात. संसर्गजन्य आजार, गुप्तरोगांची, एचआयव्ही, एड्स बाधा निष्पन्न होते. अशा तृतीयपंथीयांना वेळीच समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला, उपचार देण्याची गरज भासते, असे गाबरेल म्हणाल्या.
पुणे शहरात १० हजारांहून अधिक तृतीयपंथीय लोक आहेत. शहरातील बुधवार पेठ भागात २००९ मध्ये स्थापन झालेली 'आशीर्वाद' संस्था तृतीयपंथीय लोकांसाठी कार्यरत आहे. गेल्या एक वर्षात शहरातील शंभर तृतीयपंथीयांची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी ६० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते २५ ते ६० वयोगटातील आहेत. या लोकांची संस्थेच्या माध्यमातून दर ६ महिन्यांतून तपासणी करणे, गुप्त रोगाविषयी माहिती देणे, अनैसर्गिक संबंध टाळण्यास सांगणे, अशा प्रकारचे मार्गदर्शन केले जाते. परंतु, आपल्याला एड्स झाला आहे, अशा भीतीखाली हे लोक वावरतात, त्यामुळे त्यांच्यावर काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. आशीर्वाद संस्थेने या लोकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. तृतीयपंथीय हासुद्धा समाजाचा एक घटक असून, त्यांच्यात भेदभाव करू नये, त्यांना समाजाने स्वीकारावे, असेही त्या म्हणाल्या.
याशिवाय आशीर्वाद संस्था बुधवार पेठ भागातील सर्व वेश्या गल्लीतील महिलांसाठीही कार्य करते. महिलांची तपासणी करणे, कन्डोम वापरण्यास सांगणे, आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलांना एआरटी सेंटरकडून उपचार सुरू करणे, अशी कामे ही संस्था बिगर सरकारी संस्थेच्या (एनजीओ) सहकार्याने करते.
तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन आणि सर्वांगीण विकास याच उद्देशाने आशीर्वाद संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. समाजाने दूर लोटलेल्या या उपेक्षितांना ही संस्था एक 'आशीर्वाद'च ठरली असून, विविध ठिकाणच्या तृतीयपंथीयांना एकत्तित करून एकसंधपणे माणुसकीच्या आणि सन्मानाच्या हक्काचा लढा देण्यास संस्था सज्ज झाली आहे.

Saturday, October 30, 2010

सेक्समधील एकाग्रतेसाठी 'पद्मासन'

योग आपल्या अध्यात्मिक व सेक्स जीवनात संतुलन निर्माण करण्‍याचे कार्य करत असते. 'योग' या शब्दाचा अर्थ 'जोडणे' अथवा 'मीलन' असा आहे. शरीर व आत्मा यांना योगाच्या माध्यमातून एक विशिष्ट आकार दिला जातो. संभोग करतांना दोन जीवांमध्ये एकाग्रता निर्माण करून त्याचे रूपांतर समाधीमध्ये करण्याचे सामर्थ्य योगामध्ये असते. परंतु, आपले शरीर अस्वच्छ असेल तर आपल्याला हा आनंद उपभोगण्यासाठी वाट पाहावी लागेल.

योगशास्त्रात विविध आसने सां‍गितले असून प्रत्येक आसनात विशिष्ट प्रकारचे गुण आहेत. संभोगात एकाग्रता मिळविण्‍यासाठी पद्मासन अधिक फायदेशीर ठरते. आपण व आपल्या जोडीदारात एकमेंकाविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम पद्मासन करत असते. सेक्स करताना आपले मन स्थिर राहणे आवश्यक असते. चित्त थार्‍यावर राहण्यासाठी ध्यानमुद्राद्वारे केले जाणारे पद्मासन अधिक फायदेशीर असते. समागमात एकाग्रता निर्माण झाल्यानंतर सेक्सचा मनमुराद आनंद आपण लुटू शकता.

पद्मासन केल्याने हाता-पायांच्या सांध्यांमध्ये, मांसपेशींमध्ये ताण निर्माण होत असतो. त्यामुळे स्नायू बळकट होतात. तसेच पोट व मुत्राशयाचे आजारही दूर होतात. शारिरीक व्याधी दूर झाल्याने शरीरात विशिष्ट उत्तेजना संचारते व संभोगक्रियेसाठी ही उत्तेजना आपल्या आनंदात नक्कीच भर घालणारी असते.

'पद्मासन' कसे कराल? एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणार्‍या आसनांमध्ये पद्मासन हे महत्त्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासनही असेही म्हणतात.

कृती : हे आसन बसून केले जाते. आधी पाय लांब करून बसा. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून डाव्या पायाला उजव्या पायाच्या जांघेवर ठेवा. नंतर उजवा पाय डाव्या जांघेवर ठेवा. दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यांवर सरळ ठेवा. दोनही हाताचे अंगठ्याजवळील बोट अंगठ्यावर ठेवा. बाकी तिन्ही बोटे सरळ ठेवा. डोळे बंद करा. पाठ ताठ ठेवून बसा. पद्मासनाला सर्व दुर्भावनांचा विनाशक म्हटले जाते.

पद्मासनाचे फायदे : 'इंद पद्मासन प्रोक्तंसर्वव्याधी विनाशनम्' -म्हणजेच पद्मासन सर्व व्याधींचा नाश करते. सर्व व्याधी म्हणजेच शारीरिक, दैविक आणि भौतिक व्याधी.

पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. साधना आणि ध्यान करण्यासाठी हे आसन उत्कृष्ट आहे. याने चित्त एकाग्रीत होते आणि एकाग्रचित्ताने धारणा सिद्ध करता येते.

घ्यावयाची काळजी : ज्यांचे पाय अती प्रमाणात दुखत असतील त्यांनी हे आसन करू नये.

Monday, September 27, 2010

शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर


धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहोत. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन ‍श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली. कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुर्णी नगरी दुमदुमून जात असते.

या मंदिराच्या स्थापनेमागेही आख्यायिका आहे. श्री संत कडोजी महाराज मंदिरातील गादीचे आठवे वारसदार शांताराम महाराज भगत यांनी ही आख्यायिका सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीसंत कडोजी महाराज दरवर्षी विठ्ठलचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत असत. एकदा ते कार्तिक शुध्द एकादशीला पंढरपूरला निघाले असता वाटेतच त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. 'अरे मी तुझ्याच गावास असून तू एवढ्या लांब कशासाठी निघालास, तुझ्या शेंदुर्णी नगरीत असलेल्या उकिरड्याखाली मी आहे. माझे वाहन वराह आहे. तू मला वर काढून माझी स्थापना कर.' या साक्षात्कारानंतर कडोजी महाराज वारी अर्ध्यातच थांबवून शेंदुर्णीला परतले. झालेला प्रकार गावकर्‍यांना सांगितला. परंतु, गावकर्‍यांनी त्यांना वेड्यात काढले. मात्र, महाराजांची पांडुरंगाच्या साक्षात्कारावर दृढ श्रद्धा होती. अखेर त्यांनी स्वत: उकिरडा खोदायला सुरवात केली. खोदतानाच काही फुटावरच पांडूरंगाने सांगितल्याप्रमाणे पाषाणाचा भव्य वराह बाहेर निघाला. आता गावकर्‍यांचा महाराजांवर विश्वास बसला. मग तेही या खोदकार्यात सामील झाले. अवघ्या 25 फुटावर काळ्या पाषाणातील साडेचार फुटाची पांडुरंगाची मूर्ती बाहेर आली. तीच मूर्ती सध्या मंदिरात आहे.

मूर्तीच्या उजव्या हाताला गरूड तर डाव्या हाताला हनुमान आहे. मुर्तीचा चेहरा हसरा असल्याने भाव बदलतात असे वाटते. विष्णूरूपी पांडूरंग असल्याने त्याचे ‍श्री त्रिविक्रम असे नामकरण करण्यात आले. मंदिरातील वराहाला खांदा आहे. खोदकाम करताना कुदळीचा वार पांडुरंगाच्या नाकाला लागला होता व जखमेतून रक्त आले होते, अशी ही आख्यायिका आहे. महाराष्ट्रावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीचे निवारण करण्यासाठी वडार समाजबांधव शेंदुर्णी येथे वराह पुजनासाठी येत असतात.

संत कडोजी महाराजांनी त्रिविक्रमाच्या रथोत्सवास प्रारंभ केला. परंपरेनुसार शेंदुर्णी येथे कार्तिक शुध्द एकादशीला रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येथे 263 वर्षांपूर्वी सागवान लाकडाचा 25 फूट उंच भव्य रथ असून संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जुना हा रथ आहे. रथाचा तोल सांभाळण्यासाठी भाविकांकडून रथाच्या चाकाला मोगरी लावण्याचे काम केले जाते. चोपदार व भालदार अशी प्राचीन परंपरा येथे पहावयास मिळते. चोपदार हा सोनार समाजाचा तर भालदार हा सुतार समाजाचा आहे. येथील वडनेरे घराण्यातील सातवे वारसदार जगन्नाथ चिंधु वडनेरे हे चोपदार आहेत व एकनाथ वामन सुतार हे भालदार म्हणून काम पाहत आहेत. भाविक मोठ्या संख्येने रथोत्सवात सहभागी होत असतात.

शेंदुर्णी नगरीतून भव्य मिरवणूक काढली जाते. गावात ज्या ठिकाणी रथ थांबला त्या ठिकाणी भाविक श्रीफळ, केळी, कानगी (दक्षिणा) वाहून रथाचे मोठ्या श्रध्देने दर्शन घेतात. सर्वधर्मातील नागरिक रथोत्सवात सहभाग घेत असतात. मुस्लिम बांधव ढोलताशे वाजवत मिरवणुकीत सहभागी होतात. तसेच लेझीम झांजे पथक व खेड्यापाड्यावरून आलेल्या वारकर्‍यांच्या टाळ मृदंग व हरिनामाच्या गजराने शेंदुर्णी नगरी दुमदुमून जाते.

यात्रोत्सव:
शेंदुर्णी नगरीतून वाहणाऱ्या सोन नदीच्या पात्रात कार्तिक शुध्द पोर्णिमेपासून 10 दिवसाची भव्य यात्रा भरत असते. दशमीपासून चतुर्दशी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

कसे पोहचाल-
महामार्ग-
जळगाव जिल्ह्यातील जामनेरपासून अवघ्या 16 किलोमीटरवर हे मंदिर आहे. तसेच पाचोरा येथूनही शेंदूर्णी येथे जाण्यासाठी खाजगी वाहन सहज उपलब्ध होतात. औरंगाबादहून सोयगावमार्गे शेंदुर्णीला पोहचता येते.

रेल्वे मार्ग-
जामनेर- पाचोरा नॅरोगेज रेल्वे मार्गावर शेंदुर्णी रेल्वे स्थानक आहे. हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या पाचोरा स्थानकाशी जोडण्यात आलेला आहे.

हवाई मार्ग-
शेंदूर्णी येथे येण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे. औंरगाबाद- सोयगावमार्गे- शेंदूर्णी 125 किमी अंतर आहे.